औरंगाबाद: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आ.सुभाष झांबड यांच्या प्रचाराकरिता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज जिल्ह्यात दोन ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत. आज सायंकाळी ते उद्योजक व व्यावसायिकांशीही संवाद साधणार आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून, आता केवळ दहा दिवसांचा अवधी शिल्लक आहे. प्रचारासाठी मोजकेच दिवस उरल्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारास वेग आला आहे. या मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांचा प्रचार जोरात सुरू असून, आज दुपारी लासूर येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे झांबड यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. सायंकाळी 7 वाजता गंगापूर येथे ही त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेपूर्वी सायंकाळी पाच वाजता चव्हाण हे शहरातील जिमखाना क्लब येथे आयोजित चर्चासत्रात उद्योजक, व्यापारी व व्यावसायिकांशी संवाद साधणार असल्याचे पक्षाच्या वतीने कळविण्यात आले.